पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून अभिनेता Aamir Khan यांनी राज्यात सुरू केलेले पाणलोटाचे कार्य आज एक सर्वसामान्यांची चळवळ बनले आहे.

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून अभिनेता Aamir Khan यांनी राज्यात सुरू केलेले पाणलोटाचे कार्य आज एक सर्वसामान्यांची चळवळ बनले आहे. त्यांच्या या कामाविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज भेट दिली.

आपल्या देशात ऋतूमान अनियमित असल्याने पाणी साठवण्याची योजना राबवणे अत्यावश्यक आहे. सर्वसामान्यांचा सहभाग घेऊन त्यांना पाणीसंवर्धनाच्या कामासाठी उद्युक्त करण्याचे कौतुकास्पद काम आमिर खान यांची टीम करत आहे. केवळ पिण्यासाठी पाणीसंवर्धन नाही तर ६० टक्के शेतीवर अवंलबून असलेल्या देशात शेतीसाठी पाण्याचा योग्यप्रकारे वापर करण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. याबाबत इस्त्राईलचे उदाहरण समोर ठेवायला हवे. पाण्याच्या अत्यल्प उपलब्धतेतही त्यांनी थेंब थेंब वाचवून शेतीचे नंदनवन फुलवले आहे. आपल्या एॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक कसे घेता येईल यासाठी अनेक प्रयोग केले जातात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्येही भरपूर पाणी लागणाऱ्या ऊसाबाबत प्रयोग केले आहेत. पाटातून सोडण्यात आलेलं पाणी बरचसं वाया जातं, शिवाय त्यामुळे बिनकामाचे तण सुद्धा माजतात. त्याऐवजी ऊसाच्या केवळ मुळांना मुबलक पाणी उपलब्ध होईल अशी योजना केल्यास फायदेशीर ठरते. मी आमिर खान आणि त्यांच्या टीमला एॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यावेळी मी स्वतः उपस्थित राहून त्यांना इथले काम दाखवेन.
पाणी फाऊंडेशनच्या कार्यातील लोकसहभाग वाखाणण्याजोगा आहे. मला आठवतं, १९७२ साली जेव्हा दुष्काळ पडला होता, तेव्हा अमेरिकेतील एक संस्था ‘फूड फॉर हंगर’ असा कार्यक्रम राबवण्यासाठी इथे आली होती. मी त्यांना विरोध केला. त्यांना सांगितले की अशाप्रकारे धान्य वाटण्याऐवजी तुम्ही लोकांचा पाणी साठवण्याच्या कार्यात सहभाग घ्या. त्यांच्या श्रमदानाच्या मोबदल्यात त्यांना धान्य द्या. त्यांना ही गोष्ट पटली व त्यांनी ‘फूड फॉर वर्क’ असा कार्यक्रम सुरू केला. आज आमिर खान यांनाही मी असं सुचवलं आहे की रयत शिक्षण संस्थेसारख्या असंख्य शैक्षणिक संस्था आपल्या राज्यात आहेत, तिथल्या विद्यार्थ्यांचा या कार्यात सहभाग करून घ्यावा. जेणेकरून त्यांना पाणी संवर्धनाबाबत रूची निर्माण होईल, तसेच त्यांचे याबाबत शिक्षण होईल. यापूर्वीही पाणी फाऊंडेशनच्या या कामासाठी मी माझ्या खासदार निधीतून तसेच राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून काही आर्थिक मदत केली आहे आणि यापुढेही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ती करायची माझी तयारी आहे. पाणी फाऊंडेशच्या सर्व सदस्यांना या पाणी संवर्धनाच्या या कामासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *