शरदचंद्र पवार साहेबांची सभा आणि गर्दी हे समीकरण महाराष्ट्र गेली कित्येक वर्षे बघत आला आहे.

शरदचंद्र पवार यांची सभा आणि गर्दी हे समीकरण महाराष्ट्र गेली कित्येक वर्षे बघत आला आहे. काही वर्षांपूर्वी साहेबांची सभा ऐकण्यासाठी सायकलीवरून गेल्याच्या आठवणी सांगणारे लोक भेटतात. दक्षिण महाराष्ट्रात आजही काही घर आहेत त्या घरात साहेबांची सभा ऐकायला सहकुटुंब जातं, अगदी साहेबांची सभा जाहीर झाल्यापासून त्या घरातील लोकांना त्या दिवसाची प्रतीक्षा असते. असे भाग्य अलीकडच्या काळातील नेत्यांना कवचितच मिळते.

इंग्रजी राजवटीला सळो की पळो करून सोडणारे क्रांतिकारक आणि प्रतिसरकारचे झुंजार सेनानी ज्या कुंडल गावात होते त्या क्रांतिभूमीत परवा पवार साहेबांची सभा झाली. त्या सभेलाही तुफान गर्दी होती. साहेबांच्या सभेत नेहमीच वैशिष्ट्य याही सभेच्या ठिकाणी दिसलं, सर्व वयोगटातील लोक या सभेला आलेले.फेटेवाले होते, टोपी विजार शर्टवाले होते.आणि जीन्सवाले तरुणही होते.सगळ्यांनाच या सभेची उत्सुकता होती. साहे ठरल्यावेळेपेक्षा दोन तास उशीरा येणार हे जाहीर होऊनही लोकांनी चुळबुळ केली नाही.लोक शांतपणे साहेबांची वाट पहात होते.तिथं चाललेली इतर भाषण ऐकत होते.
साहेबांच्या हेलिकॉप्टरचा आवाज आला आणि सभामंडपातील वातावरण बदललं.चैतन्य जाणवायला लागलं. लोक साहेबांना पहायला आतुर झालेले.थोडी गडबड त्या हेलिकॉप्टरच्या आवाजाने झालीच.उशीरा का होईना साहेब आलं याचा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर जाणवायला लागला.
किसन दादू यादव हे माझ्या आईचे चुलते आहेत. वय वर्षे ८३. ते दोन दिवसांपासून त्यांच्या नातवाच्या प्रसादच्या मागे लागले होते.’मला साहेबांच्या सभेला घेऊन चल’आणि त्यांनी ते लहान असताना पंडित नेहरू यांची सभा कराडला चालत जाऊन ऐकली होती. त्यांनी तीही आठवण प्रसादला सांगितली.ते म्हणाले”पवारसायेबाला बघून लै वर्ष झाली. मला ने सभला”
प्रसाद आणि आप्पा त्यादिवशी सभेला गेले. साहेबांचं भाषण सुरू झालं. त्यांनी भाषणात स्वातंत्र्यशाहिर शंकरराव निकम यांचं नावं घेतलं आणि आप्पांनी एकट्यानेच टाळी वाजवली. त्यांच्या आसपासची माणस बावरली.पण आप्पा आपल्याच नादात होते. साहेब बोलत होते. लोकांशी संवाद साधत होते. लोक कानात जीव आणून साहेबांच भाषण ऐकत होते. सभा संपली. लोक उठले. मुंगीच्या गतीनं ती साहेबांना पहायला आणि ऐकायला आलेली गर्दी जाऊ लागली. प्रत्येकजण कार्यक्रमाची चर्चा करत चाललेला.
आप्पा आणि प्रसादही निघालेले. भेटल्यावर मी प्रसादला विचारलं,
“कसा वाटला कार्यक्रम?”
“भारी वाटला.”
“तुला काय आवडलं?”
“साहेब म्हणले, दोघ भाव असतील तर एकानं शेती करा. दुसऱ्यांन नोकरी करा. खर हाय नुसत्या शेतीवर कसं जमलं?बाहेरन पैस आली पाहीजेती’ शेतीतील काम करत शाळा शिकणारा प्रसाद म्हणाला.
या सभेनंतर आप्पा म्हणाले”भाषण चांगलंच हुत. पण गेल्या बऱ्याच वर्षात शाहिर निकमास्नी लोक विसरली होती. माणूस ध्येनातूनच गेला होता.साहेबांनी त्यांचं नाव घेतलं. आपल्या भागातल्या मोठया माणसाला आपुन इसरलो पण साहेब इसरल नाहीती. एवढ्या मोठया हुद्द्याव साहेब का पोहोचलं त्ये हेज्यामुळं. ध्यान चौककडं हाय त्येचं”
आप्पांना हा कार्यक्रम आवडल्याचे हे वेगळेच कारण होते. त्यांच कारण शाहीर शंकरराव निकम यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत मोठं योगदान दिलं आहे. सांगली -सातारा जिल्ह्यात आज सत्तरीच्या वयात जी माणस आहेत त्यांच्या हृदयवर राज्य करणारे शाहिर निकम.आप्पा त्यांचे चाहते त्यांचा उल्लेख भाषणात आल्यानं आप्पा खुश झालेले.आप्पांना लै आनंद झालेला.
आप्पा आणि प्रसाद यांच्या वयात ६४ वर्षाचं अंतर आहे. या दोघांनाही पवार साहेब भावले आहेत. ही घटना साहेबांच्या संसदीय कारकिर्दीच्या पन्नासीत घडतेय.लोकनेत्यांची व्याख्या याहून वेगळी काय असू शकते?
-संपत मोरे
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *