चला आज जाणून घेऊयात कि साधारण शिवकाळापासून पाटीलकी हि कशी प्रतिष्ठेची बनत गेली.

पाटील

आजही गावागावात अभिमानाने आपल्या आडनावामागे ‘पाटील’ हि पदवी लावण्याची आवड असण्यामागे मोठी ऐतिहासिक रंजक सत्य कथा आणि कारण आहे.

चला आज जाणून घेऊयात कि साधारण शिवकाळापासून पाटीलकी हि कशी प्रतिष्ठेची बनत गेली.

इतिहासात डोकावलं तर असं दिसत कि पाटील हे गावाचे एक प्रकारे राजेच असत. ह्या विधानात अतिशयोक्ती मुळीच नाही हे खालील लेखावरून वाचकांस लक्षात येईल.

ग्रामीण जीवन हे पाटलाच्या नेतृत्वाखाली बाराबलुत्यांनी स्वयंपूर्ण असे.
हे बारा बलुते नेमके कोण होते ते पाहू:
सामान्यपणे पाटील आणि गावचा कुलकर्णी हे सोडून चौगुला, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव आणि कोळी हे प्रामुख्याने ‘बारा बलुतेदार’ म्हणून प्रसिद्ध होते.

गावचे पाटील हे ह्या सर्व बलुतेदारांचे आणि सगळ्या गावाचे केंद्रस्थान असत.

गावातील न्यायनिवाडे, तंटे, इतर वादविवाद आणि गावाचे विषय हे पाटलाच्या चावडीवर न्यायपूर्वक सोडविले जात. गावातील अडल्या नडल्याला संसारपयोगी गरज पडल्यास
पाटीलच मदतीस धावून जात. गावातील लग्न कार्य असो किंवा कोणाची काही आर्थिक अडचण असो, गावचे पाटील ह्यात वडील बंधू प्रमाणे कायम मदतीस अग्रेसर असत.

दुष्काळाच्या प्रसंगी गावातील गरीब रयतेचे पोट हे पाटील आपले घरातील धान्य गावाला वाटून भरत असत ह्याची इतिहासात भरपूर उदाहरणे आहेत.

परचक्रापासून गावाच्या रक्षणाची जबाबदारी हि पाटलाची असे. पाटलाकडे स्वतःची छोटी फौजही असे. गावावर दरोडेखोरांचा हल्ला किंवा शत्रूचा एखादा हल्ला झाला तर
पाटलाला आपल्या जवळील फौज त्यासाठी वापरावी लागत असे.

गावाची राजाकडे असलेली सरकारी काम हि पाटलाच्या मदतीनेच पूर्ण होत असत. शिवाय युद्धप्रसंगी सैन्याची गरज पडल्यास गावातून तरुण शूर शोधून त्यांची फौज पाटलास
राजाच्या मदतीस पाठवावी लागत असे.

पाटील हा गावच्या केंद्रस्थानी असल्यामुळे त्याच्या संसारपयोगी वस्तू त्यास गावातील बारा बलुतेदार मोफत पुरवीत असत. पाटलाच्या चावडीवर अनेक गावकरी सरकारी
कामानिमित्त येत असल्यामुळे पाटलाची चावडी हि कायम गर्दीने भरलेली असायची.

आता ह्या भेटीस आलेल्या लोकांना पान तंबाखूसाठी लागणारी पाने दररोज १०० पर्यंत गावच्या तांबोळ्याला आणून द्यावी लागत असत. पाटलाच्या घरी आणि चावडीवर गोड्या
तेलाच्या समया व ठाणवया दिवे असत. त्याकरिता हवे असलेले तेल हे गावच्या तेल्याला द्यावे लागत असे. पूर्वी साधारण गावात तेलाचा घाना हा एखादाच असायचा.
पण चांभारवाड्यात चांभारांची घरे अधिक असत. त्या सर्व चांभारजातीने एकचर्मी जोडा दरवर्षी पाटलास घालावयास द्यायला लागत असे.

पाटलास बसावयास बैठक असायची. ह्या बैठकीसाठी दोन पट्यांचा चवाळ्याचा चौकोनी लोकरीचा घोंगडीवजा तुकडा गावच्या धनगरास द्यावा लागत असे. थंडीच्या दिवसांत
पाटलास पांघरावयास हवी असलेली पासोडी गावातील कोष्टी आणून देत असे. कोष्ट्याप्रमाणे गावात शिंप्यांचीही घरे अनेक असल्यामुळे सर्व शिंप्यांनी मिळून दिवाळीत पाटलीन बाईकरिता वर्षाला पाच चोळखण द्यावे लागत असत.

तांबोळ्यापासून पानतंबाखु करीता पाने मिळाली तरी सुपारीवाचून त्यांचा काय उपयोग? यासाठी बाजारच्या दिवशी बाजारात बकालांनी दुकाने मांडली म्हणजे प्रत्येक दुकानदाराकडून एक सुपारी पान विड्यासाठी पाटलास दिली जात.

पाटलाच्या संसारास जोंधळा, गहू यांशिवाय कडधान्ये आणि डाळीही लागत असत. बाजारच्या दिवशी दुकानदार पाटलास हे जिन्नस पुरवीत असत. आठवडी बाजारात माळणी
पाट्या घेऊन व माळी धोतरे पसरून भाजी विकत. त्यातून पाटलास हवी ती भाजी माळी पाटलास देत असे.

पाटलाच्या बायका सहसा वाड्याबाहेर निघत नसत. पाटलाच्या वाड्यावरील पाण्याची गरज हि गावचा कोळी भागवत असत. गावातील विहरीतून किंवा आडातून पाणी भरून ते ह्या कोळ्यास पाटलाच्या वाड्यावर पोचते करावे लागत असे.

गावगाड्यामुळे पाटलाच्या वाड्यातील स्वयंपाकघरातील चुली ह्या कायम पेटत्या असायच्या. ह्या चुलींसाठी लागणारे सरपण हे रानात जाऊन लाऊडफाटे गोळा करणारे मोळीवाले पुरवीत असत.

गावातील मांग विहरीच्या मोटेचा नाडा बनवून देत असे. कुंभार संक्रांतीच्या दिवशी पाटलाच्या वाड्यावर खण, मडकी देत असे.

मांसाहार हे ग्रामीण जीवनातील आवडत जेवण. आजच्यासारखी सुबत्ता त्या काळी नसल्यामुळे भाजीपाला काय किंवा धान्य काय, हे बेताचेच पिकायचे. त्यामुळे मटण हे
घरोघरी शिजत असे. प्रत्येकाच्या घरी कोंबड्या बकऱ्या असायच्या.

गावात सरकारी अधिकारी किंवा सरदार आला तर गावच्या कसायाला पाटलाच्या वाड्यावर बकर कापून न्यावं लागत असे.

पाटलाच्या वाड्यावर ह्या सर्व जीवनावश्यक जिनसा देणाऱ्या ह्या सर्व बलुतेदारांना पाटील ह्या बदल्यात आधुली- पायलीन धान्य देत असत. अडल्यानडल्याला पैसाअडका देत असत.

त्या काळी ग्रामीण जीवन हल्लीसारखे रुक्ष आणि कंटाळवाणे नव्हते. दर महिन्याला एखादातरी सण यायचाच. सण आला म्हणजे गावकरी मोठ्या आनंदाने हौसेने सण थाटाने साजरा करीत. ह्या सणात पाटलाला अग्र पूजेचा मान असायचा.

सणांना चैत्र महिन्यातील गुढीपाडव्यापासून सुरुवात व्हायची. गावातील पहिली गुढी हि पाटलाच्या वाड्यावर उभारली जायची. त्यानंतर गावात गुढ्या उभारल्या जायच्या.

चैत्र मास संपला कि वैशाखापासून जेष्ठा अखेर लग्नसराई धुमधडाक्यात गाजायची. तेंव्हा नवरा नवरी अक्षता पडून झाल्यावर पहिला टिळा हा पाटलाच्या कपाळाला लागायचा आणि विड्याचा पहिला मान हा पाटलाला दिला जायचा.

दसऱ्याच्या नवरात्रांत आणि दिवाळीत वाजंत्र्यांकडून पाटलाच्या वाड्यावर सनई चौघडा वाजत असे.

शिलंगणास पाटील घोड्यावर बसून गावकऱ्यांसमवेत गेले कि शमीपूजन हे पाटलाच्या हस्तेच होत असे.
भाद्रपदाच्या अखेरीस पोळ्याचा सण असायचा. त्या दिवशी बैलांना कावेच्या पट्यांनी रंगवायाचे आणि त्यांच्या शिंगांना वाखाडे गोंडे व गळ्यांत घुंगरू बांधून बैलांच्या पुढे ढोल लेझीम वाजवीत गावभर मिरवणूक निघायची. ह्या मिरवणुकीत
पाटलाच्या खिल्लारी बैलांचा मान हा पहिला असायचा.

भाद्रपदात शुद्ध पक्षात गौरी आणि गणपती यायचे. सर्वात पहिला गणपती हा पाटलाच्या वाड्यावर बसायचा. वर्षाअखेर फाल्गुनमासी शिमग्याचा सण मोठा आणि शेवटचा असायचा.
पूर्णिमेस पूर्ण चंद्र आकाशात विलसत असता होळीच्या टेकावर गावची मुख्य होळी धडाक्याने पेटायची. तिला गावचे लहानथोर जमायचे. होळीत टाकायच्या पहिल्या पुरणपोळीचा मान हा पाटलाचा असायचा. नंतर प्रत्येकाच्या घरची पुरणपोळी हि होळीत पडायची.
मग सर्व गावातील पोरंसोरं मिळून जोरजोराने होळी रे होळी पुरणाची पोळी….. संध्याकाळी अशी गाणी जोरजोराने ओरडायची.

ह्या शिवाय गावाकडून पाटलाला विशेष मान असायचा.
पाटलाला गावातल्या प्रत्येक लग्नात खोबऱ्याची एक वाटी आणि शेला मिळायचा.

शिराळशेटाच्या अनेक मूर्तींत मिरवणुकीमध्ये पाटलाचा शिराळशेठ पुढे असायचा.

महजरावर व अन्य सरकारी कागदावर निशाणी नांगर फक्त मोकदम पाटलाचाच कुलकर्ण्याने करावयाचा. पाटलाच्या वाड्याला कर माफ असायचा.

सरकारांतून दरसाल पाटलास मानाचा शिरपाव मिळायचा.
ज्याच्या शेतात हुरडा पिकला तो मानाने पाटलाच्या वाड्यावर त्याच्या शेतातील हुरडा घेऊन येत असे. शेतकऱ्यांच्या खळ्यावर मळणी झाल्यावर त्यातील एक सेल पाटी
धान्य पाटलास मान म्हणून दिले जात असे.

आता एव्हडा मानमरातब पाटलास मिळत असल्यामुळे पाटीलकीच्या वतनाबद्दल भाऊबंदकीत भांडणेही लागत असत. हि भांडणे सोडविण्याकरिता आजू बाजूच्या गावातील पाटील मंडळीं एकत्र येत असत.

मग पाटीलकीच्या निवाड्यातुन थोरले पाटील आणि धाकटे पाटील तयार होत असत. ह्यांच्यातही पोळ्याच्या मिरवणुकीत कोणाचा बैल पुढे ह्यावरुन वाद होत असत. दिवाळीत महारमांगांनी पहिले कोणास ओवाळावे आणि होळीत पहिली पोळी थोरल्या पाटलाने टाकावी कि धाकट्या पाटलाने टाकावी ह्यावरूनही वादविवाद होत असत. शेवटी हा तंटा गावपंचायतीपुढे जात असे. त्यातून मग निवड करून मान दिला जात असे.

तर अशी हि गावची पाटीलकी.
पाटलाने वडीलकीच्या नात्याने गाव जपलं. गावची गरीब पोर शिकायला शहरात पाठवली. गावातील गरिबांच्या पोरींची लग्न स्व-खर्चाने लावून दिली. सणावाराला अडीअडचणीला
धनधान्य पैसे अडका दिला. गावचे बाराबलुते आणि सगळं गाव पाटलाने जपलं; चालवलं. म्हणूनच आजही ३८० वर्षांनंतरही पाटीलकी टिकून आहे. लोक अभिमानाने आडनावापुढे पाटील लावतात ते ह्याच कारणांमुळे.

लेख समाप्त
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम निरंतर

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *