पाणी फौंडेशन ही दुष्काळावर मात करणार्‍या श्रमकर्‍यांची चळवळ

आमीर खान; अनपटवाडीत पाणी फौंडेशनचे चित्रीकरण

पाण्यासाठी काम करायचे, या उद्देशाने पाणी फौंडेशनने वॉटर कप स्पर्धा सुरू केली आहे. मात्र, फौंडेशन म्हणजे केवळ स्पर्धा नसून दुष्काळावर मात करण्यासाठी धडपडणार्‍या श्रमकर्‍यांची चळवळ आहे. स्पर्धा केवळ बक्षीस मिळविण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी गावकर्‍यांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत, असे मत प्रसिद्ध अभिनेते आमीर खान यांनी व्यक्त केले.

राज्यात सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेचे आधारस्तंभ व अभिनेता आमीर खान हे मंगळवारी सकाळीच कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडीत दाखल झालेे. तेथे वॉटर कपमधील कामाच्या डॉक्युमेंट्रीचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर आमीर खान हे खटाव तालुक्यात वॉटर कपचे काम पाहणार आहेत. यावेळी आमीर खान यांची पत्नी किरण राव, अभिनेते जितेंद्र जोशी, गीतांजली कुलकर्णी, डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते. सर्वांचा अनपटवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने वृक्षरोप भेट देऊन सत्कार करण्यात आला. आमीर खान व किरण राव यांना फेटेही बांधण्यात आले. अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फौंडेशनच्यावतीने राज्यात तीन वर्षांपासून वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतून अनेक गावे  पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाली आहेत. त्याच मार्गावर आणखी काही गावे जात आहेत. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यात मोठे काम झाले आहे. पहिल्या वर्षी कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. दुसर्‍या वर्षीही जिल्ह्यातील अनेक गावांनी राज्यात नावलौकिक मिळविला होता. 2016 साली तीन तालुके आणि 116 गावे स्पर्धेत होती. मागील वर्षी तीस तालुके आणि 1300 गावांचा समावेश होता. यंदा 75 तालुके आणि 5500 गावांचा या स्पर्धेत सहभाग आहे.

जिल्ह्यात या स्पर्धेच्या माध्यमातून दुष्काळमुक्तीचं ‘तुफान आलंया’. जिल्ह्यातील गावांची यशोगाथा सर्वदूर पोहोचली आहे. त्यामुळे वॉटर कप स्पर्धेला सुरुवात होण्यास आणखी अवधी असतानाच अभिनेता आमीर खान हे सातारा जिल्ह्यात आले. मंगळवारी सकाळीच ते पत्नी किरण राव यांच्यासमवेत अनपटवाडीत दाखल झाले. त्यांच्याबरोबर सत्यजित भटकळ, कोरेगावच्या प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, तहसीलदार स्मिता पवार, नायब तहसीलदार विठ्ठलराव काळे उपस्थित होते. अनपटवाडीत वॉटर कप स्पर्धेत कामे झाली आहेत. त्याची पाहणी आमीर खानने केली. अनपटवाडीत अडीच लाख घनमीटर पाणी अडवण्याचे काम झाले आहे. यात नालाबांध, सीसीटी, डीपीसीसीटी बंधारे, सिमेंट बंधारे, माती बंधारे, गेबियन बंधारे, खोलीकरण व रुंदीकरण, पवनाई बंधारा आदी कामे करण्यात आली आहेत. गावकर्‍यांनी एकजुटीने श्रमदान केले होते. गेल्या दोन वर्षांपासून ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे’चे प्रशिक्षण केंद्र घेऊन 200 गावांमधील किमान एक हजार प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतल्याची माहीती सरपंच मनोज अनपट यांनी दिली. यावेळी विविध कामांबाबत आमीर खान यांनी ग्रामस्थांकडून माहिती घेतली. अनपटवाडीत जलसंधारणाच्या कामाचे चित्रीकरण करण्यात आले.

Source:http://www.dainikaikya.com/20180328/5753468611205349307.htm

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *