नववी पास युवकाचा अॅमेझॉनला १.३ कोटींचा चुना

 

कुरिअर कंपनीत काम करणाऱ्या एका नववी पास युवकाने चक्क अॅमेझॉन ई-कंपनीला १.३ कोटी रुपयांचा चुना लावला आहे. अॅमेझॉनकडून मिळालेल्या एका टॅबच्या सहाय्याने बिलांमध्ये हेराफेरी करून हा गैरव्यवहार केल्याचा आरोप या युवकावर आहे.

दर्शन इलियास ध्रुव (२५) असे या युवकाचे नाव आहे. त्याने आपल्या मित्रांनाही महागड्या उत्पादनांची ऑर्डर नोंदवायला सांगितली. पैसे ट्रान्सफर न होताही उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवली. या प्रकरणी ४ तरुणांना २५ लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. यात २१ स्मार्टफोन, १ लॅपटॉप, एक आयपॉड, १ अॅपलच्या घड्याळाचा समावेश आहे. चार बाईकही पोलिसांनी सील केल्या आहेत.

हे प्रकरण सप्टेंबर २०१७ आणि फेब्रुवारी २०१८ मध्ये समोर आले. या कालावधीत अॅमेझॉनला चिकमंगळुरू शहरातून ४,६०४ ऑर्डर्स मिळाल्या ही सर्व उत्पादने दर्शनमार्फत पोहोचवण्यात आली. दर्शन एकदंत कुरिअर कंपनीत काम करत होता. या कंपनीचा अॅमेझॉनशी करार झाला होता. आतापर्यंत या प्रकरणाची पुरेशी स्पष्ट माहिती पुढे आलेली नाही. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेमेंट आणि डिलीव्हरीशी संबंधित माहितीसाठी एक डिजीटल टॅब अॅमेझॉनने दर्शनला दिला होता. याद्वारे दर्शनने पेमेंट प्रक्रियेत गडबड केली. दर्शनने कार्ड स्वाइप करताना एक बनावट अलर्ट तयार केला होता. अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांना ऑडिटच्या वेळी ही बाब ध्यानात आली.

source:https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/karnataka-class-10-dropout-dupes-amazon-of-rs-1-3-crore/articleshow/63266746.cms?utm_source=mt&utm_medium=Whatsapp&utm_campaign=onpagesharing

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *