नवउद्योजकांना बँकेकडून कर्ज कसं मिळेल ?

 

स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हटलं की आपल्या समोर पहिला प्रश्न उभा राहतो की, त्यासाठी लागणारे भांडवल कसे उभे करायचे ?? व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असलेल्यांपैकी 70 % लोकांची गाडी इथेच अडते आणि त्यांचा व्यवसाय आयुष्यात कधीच सुरु होत नाही.

योग्य अर्जदारास कर्ज देणे हेच जर का बँकेचे काम असेल व आपल्याला बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करायचे असेल तर आपल्याला स्वतःला योग्य अर्जदार म्हणून सिद्ध करणे गरजेचे आहे.

व्यावसायिक कर्ज मिळवण्याची पूर्वतयारी
बचत करणे : कोणत्याही व्यवसायात तुम्ही स्वतः किती भांडवल लावता आहात हे महत्वाचे आहे. जर तुम्ही स्वतःच्या व्यवसायात पैसा लावणार नसाल तर बँक किंवा अन्य कोणी का लावेल ? तुम्ही नोकरी करत असाल किंवा विद्यार्थी असाल , तर आतापासून स्वतःच्या व्यवसायासाठी बचत करायला सुरुवात करा. बँकेने तुम्हाला कर्ज देण्यासाठी तुमचे त्या बँकेशी व्यवहार असले तर ते चांगले. त्यामुळे योग्य बँकेची निवड करून त्यात बचत खाते (Savings Account) , आवर्ती खाते ( Recurring Account) किंवा ठेवी ( Fixed Deposit) यापैकी तुम्हाला योग्य वाटेल त्यात पैसे जमा करायला सुरुवात करा. चांगला एखाद्या म्युच्युअल फंडाची SIP घेऊन त्यात सुद्धा पैसे गुंतवू शकता. अश्या प्रकारे बचत करून दोन तीन वर्षात थोडी का होईना ,पण तुमची स्वतःची राशी जमा होईल.

CIBIL SCORE तयार करा.

भारतीय अर्थव्यवस्थेत सिबिलचे महत्व अनन्यसाधारण आहे. तुमचा सिबिल तपासल्याशिवाय तुम्हाला कोणतीच वित्तसंस्था कर्ज देत नाही. आपला सिबिल तयार करण्यासाठी 15 ते 20 हजार रुपयांचे तरी बँक किंवा वित्तसंस्थेकडून कर्ज घ्या . हल्ली मोबाइल किंवा अन्य वस्तु घेण्यासाठी अनेक छोट्या छोट्या फायनांन्स कंपन्या कर्ज देतात. तुलनेने ही छोटी कर्ज मिळवणे सोपे असते. अशी कर्जे घ्या व नियमाप्रमाणे त्याचे EMI म्हणजे हप्ते हे न चुकता फेडा. तुमचा एकही EMI bounce होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला कर्ज मिळाले व तुम्ही त्याचे EMI न चुकता भरू लागलात की तुमचा सिबिल स्कोर सुधारायला लागेल. एकूण 900 पैकी तुमचा स्कोर 700 + असायला हवा. 700 + सिबिल असलेले अर्ज फेटाळले जात नाहीत.

आवश्यक नोंदणी: तुमच्या व्यवसायाची नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. उद्योग नोंदणी करण्याचे खालील प्रकार आहेत. त्यापैकी तुम्ही योग्य पर्याय निवडून व्यवसायाची नोंद करू शकता.
एक मालकी (Sole Proprietary firm)
भागीदारी ( Partnership firm)
एकल व्यक्ती कंपनी ( One Person Company)
सीमित भागीदारी ( Limited Liability Partnership)
खासगी कंपनी ( Private Limited Company

चालु खाते (Current Account) उघडा: बरेच छोटे उद्योजक हे बँकेत चालु खाते उघडण्याऐवजी व्यवसायाचे बरेचसे व्यवहार हे स्वतःच्या बचत खात्यातून करतात. ही चुकीची पद्धत आहे. तुमचे सर्व व्यवसायासंबधी व्यवहार हे फक्त कंपनीच्या चालु खात्यातूनच व्हायला हवेत. तुमच्या स्वतःच्या खर्चासाठी एक ठराविक रक्कम दरमहा तुमच्या बचत खात्यात वळती करा.

बँक कर्ज

बँकेकडून प्रामुख्याने दोन प्रकारची व्यावसायिक कर्जे दिली जातात.
टर्म लोन ( दीर्घकालीन कर्ज)
कॅश क्रेडिट – वर्किंग कॅपिटल ( खेळत्या भांडवलासाठी)

व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री , जागा इत्यादी घेण्यासाठी बँकेकडून तुम्हाला टर्म लोन दिले जाते. टर्म लोन मिळवण्यासाठी तुमच्या व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच बिझनेस प्लॅन तयार करावा. या प्लॅनमध्ये व्यवसायात लागणारी यंत्रसामग्री , कच्चा माल , जागा इत्यादी स्थायी गोष्टीच्या तरदूती केलेल्या असतात. सोबत तुम्ही या प्रोजेक्टमधून कश्या प्रकारे नफा कमवाल व बँकेचे पैसे परत फेडाल याचे विवरणही तुम्हाला द्यावे लागेल. तुम्ही दिलेल्या प्रोजेक्ट रिपोर्ट बँक अभ्यास करून ते वास्तवात येणे शक्य आहे की नाही याची पाडताळणी करते व त्यानुसारच तुम्हाला कर्ज मंजूर केले जाते. अनेक वेळा हे कर्ज तुमच्या खात्यात न देता मशीनविक्रेता व अन्य पुरवठादारांना परस्पर दिले जातात. त्यामुळे कर्ज ज्या कारणांसाठी दिले जात आहे त्याचसाठी पैसे वापरले जातात. टर्म लोन हे तुम्हाला ठराविक कालावधीपर्यंत दिले जाते. मासिक हप्त्यानुसार तुम्हाला त्याची परतफेड करायची असते.
नवउद्योजक अनेक सरकारी योजनांनुसार टर्म लोनसाठी अर्ज करू शकतात. सरकारी योजनांनुसार तुम्हाला काही प्रमाणात अनुदानही मिळू शकते. तुम्ही व्यवसाय करून अन्य लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा , या हेतुने सरकार अनुदान देत असते.

बँकेकडे कर्ज मागायला जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि, ती नव्याने कर्ज घेणाऱ्या प्रत्येकाची काटेकोरप्रमाणे तपासणी करते. म्हणून तुम्ही त्यांच्या कसोटीला तावुन सुलाखून उतरणे गरजेचे आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *